Wednesday, 2 December 2015

राष्ट्रगीत

च्यामायला ह्या ‘सहिष्णू’ विचारजंतांच्या ... 
राष्ट्रगीत लागल्यावर राहतो उभे आम्ही,
अगदी मनापासून आणि आनंदानी .
घरी बसून क्रिकेटची मॅच असुदे नाहीतर पिक्चरच्या आधी.
कोणी लक्ष ठेवायला नसेल तरी;राहतो आम्ही त्यासाठी उभे.
आवडतं आम्हाला त्या राष्ट्रगीताच्या सुरावटींच्या बरोबर गुरुदेवांचे शब्द म्हणायला
पिक्चर सुरु होण्याच्या आधी कधी ते झाकीर भाईंच्या तबल्याच्या बोलांमधून,कधी हरिजींच्या बासरीमधून राष्ट्रगीताची सुरावट बनून येतात;तेव्हा दरवेळी अभिमान वाटतो मला माझ्या देशातल्या सगळ्या धर्मांना सामावून घेणाऱ्या विविधतेतल्या एकतेचा.
स्वतः कधीही न गेलेल्या सियाचीन मधले उणे २० अंश तापमानात सैनिकांनी केलेले ध्वजारोहण बघताना..
‘माझ्या देशाबद्दल,‘माझ्या सैनिकांच्या’ बद्दलच्या विचाराने भरून येतं मला.
गुणगुणल्यासारखे का असेना,आनंद होतो सगळ्यांच्या बरोबर म्हणताना...
मी ह्या देशाचा एक नागरिक आहे,माझ्यासोबत इतरांनाही ह्या देशाच्याबद्दल तेवढाच अभिमान आहे
ह्याची एक सुखद जाणीव होत रहाते त्यावेळी.
जे राष्ट्रगीत सतत राष्ट्रप्रेमाची भावना जागवत ठेवतं,ते थेटरमधे पिक्चरच्या आधी लावलं,
ह्याच्यावरून चर्चाच कशी होवू शकते कुठल्या देशात ?
आता ते अमेरिकेत,किंवा इतर अलाणाफलाणा देशात नाही,असले पुचाट कारण कोणी सांगू नका.
चांगल्या गोष्टी शिकायला नेहमीच पाश्चात्य देशांकडे जायची काहीच गरज नसते.
राष्ट्रगीत थेटरमध्ये लावणे हा कायदा नसेलही
थेटरात त्यावेळी उभे राहणे हे कुठल्या कायद्यात लिहून ठेवले नसेलही
पण आता त्यानी घंटा फरक पडत नाही मला आणि माझ्यासारख्या लाखोंना..
विचारजंतांनो जपून रहा,
गैर आहे मान्य पण तुम्हाला कायदा शिकवायला ,कायदा तोडायची पण तयारी आहे पब्लिकची
पब्लिकची सटकल्ये आता
जाताजाता;राष्ट्रगीत न लावण्याचे समर्थन करणार्यांच्या दाराबाहेर जावून ‘असहिष्णू’ जनतेने रोज प्रातर्विधी करू नये असाही कुठला कायदा वाचल्याचा ऐकिवात नाहीये.


https://youtu.be/QCP1XdtpMO4?list=PL14CE69C127987D8C

Wednesday, 18 November 2015

कट्यार काळजात घुसली


   
पुर्वी कधीतरी वाचलेले , 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा' नामक कार्यक्रमात , काही रेकॉर्डेड व्हिडियो मधे तुटक बघितलेले मुळ जुन्या संचातले नाटक.अभिषेकी बुवांचे संगीत आणि वसंतखा साहेबांनी अजरामर करून ठेवलेली पदे किमान हजारवेळा ऐकून कट्यारची पडलेली एक प्रचंड छाप मनावर पहिल्यापासूनच आहे.माझ्याच असं नाही तर लाखो मराठी - अमराठी नाट्य आणि संगीतप्रेमींच्याच मनावर.
त्यातून ह्यावरची उलट सुलट परीक्षणं ह्यामुळे सिनेमाबद्दल थोडे पूर्वग्रह घेऊन थेटरात जावून बसलो होतो.पण सुरवातीच्या शंकर महादेवन ह्यांच्या ‘सूर निरागस हो’ ने मनावर गारुड केलं.तिथेच संगीताच्या बाबतीतल्या शंका दूर झाल्या.परीक्षण खूप अलंकारित शब्दात नाही करत बसत (स्वभावात पण नाही म्हणा )
अभिनय- 
पंडितजी -शंकर महादेवन,झरिना-अमृता खानविलकर,सदाशिव-सुबोध भावे,उमा-मृण्मयी देशपांडे,खांसाहेब-सचिन,हे सगळे (ह्याच क्रमाने म्हणलात तरी चालेल) झकास.

शंकर महादेवाचा अभिनय त्याच्यातल्या गायकाच्या आणि संगीतकाराच्याच तोडीचा आहे ह्याच्यात चित्रपट बघितलेल्या कोणाच्याच मनात दुमत नसावे.
अमृता खानविलकर नुसतीच ‘खल्लास’ दिसली नाहीये तर तिने मिळालेल्या ‘रोल’चे केवळ अभिनयाने  सोनं केलंय.तेही संपूर्ण पोशाख परिधान करून..वाचणार्या ज्यांची कोणाची तिच्याशी वैयक्तिक ओळख असेल त्यांनी तिच्यापर्यंत ह्या भावना नक्कीच पोचवा.
सचिनना व्हिलन दाखवल्यामुळे आणि त्यांनी शास्त्रीय गाण्यात कव्वालीचे आणि कव्वालीच्या प्रसंगी शास्त्रीय गाण्यासारखे हावभाव करून एका अर्थी त्याच्या टीकाकारांना “पुन्हा एकदा महागुरूचा रोल केलाय” अश्या उघड बोंबा मारायला छान कारण दिलंय wink emoticon 
पण काही प्रसंगात त्यांनी खलनायकाच्या भूमिकेत नुसत्या डोळ्यानेही जान ओतली आहे.त्यातूनही पहिल्यांदा स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांचे मिनिटभराचे स्वगतासारखे भाषण लाजवाब.
संगीत-निव्वळ अप्रतिम.जुन्या अभिषेकीबुवांच्या चालींबरोबर दिलेली दिलेली नवीन गाणीही सुंदर.
शंकर महादेवन,महेश काळे,राहुल देशपांडे ह्यांच्या गायकीने नैय्या गंगापार केलेली आहे.त्याच्या बरोबरचे इतर गायक,गायिकाही छान.पण मधेच कै.अभिषेकीबुवांच्या आवाजातले ‘लागी करजवा कटार’ थियेटरच्या डॉल्बी साऊंडमध्ये ऐकताना काय वाटतं सांगता येणे मुश्कील आहे.फक्त अनुभव घेणे
पार्श्वसंगीत तेवढेच लाजवाब.त्यातल्या ‘इंटरल्युडला’ वापरलेली काही दाक्षिणात्य वाद्य प्रचंड परिणाम साधतात.
राजवाड्याचे सेट वगेरे –खरोखरच स्वातंत्र्यपूर्वकाळात संस्थानिकांच्या राजवाड्यात शोभेल असं.रईस !
मेकप-–स्वतः विक्रम गायकवाड ह्यांनी केलेला असल्याने अजून तारीफ काय करायची?
आता थोडं कथा आणि पटकथेबद्दल.नाटकाच्या संहिता बरीच बदललेली आहे.सदाशिव आणि उमा ह्यांच्यातले नातं गुरू बंधू - भगिनीवरून चक्क एकतर्फी प्रेमाचे घेतले आहे. का?? ते माहिती नाही,कारण त्याला आगापिछा काहीच नाही.खांसाहेबांना सुरवातीचे मोजके प्रसंग आणि शेवटचा प्रसंग सोडला तर आख्या पिक्चरमध्ये फक्त खलनायक दाखवले आहे.
खांसाहेबांच्या शागीर्द चांद आणि उस्मान ह्यांना व्हिलनचे चमचे ह्यापलीकडे काम नाही.मूळ नाटकात त्यांनाही गाण्याची साथ करायला दिलेली आहे.
तरीही मुळात इतिहास घडवलेल्या मूळ नाटकावरून केलेल्या ह्या सिनेमात,लेखकांच्या वारसांकडून पूर्वपरवानगी घेऊन घेतलेल्या सिनेमॅटीक लिबर्टीबद्दल आक्षेप असूच शकत नाही,कारण शेवटी हे एक खरे ‘नाटक’ आहे,घडलेला इतिहास नव्हे.फक्त त्यामुळे ज्यांच्या डोक्यात मूळ संचातले नाटक आहे,त्यांचा मात्र नक्कीच भ्रमनिरास होतो.त्याचवेळी एक नवीन मराठी सिनेमा म्हणून बघणाऱ्या पिढीच्यासाठी हा पिक्चर मराठीकडे,नाट्यसंगीताकडे वळायचे चांगले कारण नक्कीच ठरणारे.
नवीन पिढीने मराठी संगीतनाटक जिवंत ठेवण्याचा तन,मन,धन देवून मनापासून केलेला एक अभिनव प्रयोग म्हणून ह्याच्याकडे बघितलं तर ही ‘कट्यार’ ही खात्रीने आवडेल.आणि तसाही सिनेमा पैसा “फुल्टू पैसा वसूल” आहे.
कै.पुरुषोत्तम दारव्हेकर आणि तेवढेच कै.अभिषेकी बुवा आणि वसंतराव देशपांडे ह्यांचे म्हणून येवढे दिवस ओळखलं जाणारं ‘नाटक’ ह्यापुढे सुबोध भावे ह्याचा ‘सिनेमा’म्हणून ओळखले गेले तर नवल वाटायला नको.निदान त्यासाठी सुबोध भावे आणि टीमचा रागराग तरी निश्चितच नको.
अंबर कर्वे 
१८.११.२०१५