Saturday, 6 February 2016

#कथा_भाग_2
मावळा  

“काय सांगता काय ? मग यादव सरांनी काय केलं?”
‘सर,रस्त्यावरच्या लोकांनीच सरकारी हॉस्पिटलला अॅडमीट केलं.ऑफिसमध्येच फोन आला,मग यादवसर स्वतः गेले हॉस्पिटलला.’
“हां पुढे ?असं ब्रेक मारत नका बोलू ओ जाधव,धडाधड सांगा काय आहे ते !”
मी न रहावून जाधववरच सरकलो एकदम;माझी आधीच चिडचिड झाली होती.
माझ्या अनपेक्षित डाफरण्यावर बिच्चारा जाधव एकदम कसनुसा झाला,
‘सर यादवसरांनी तानाजीचा फॉर्म भरून स्वतःच्या मुलीला मोठ्या हॉस्पिटलला नेलं.तिला नव्हतं लागलं जास्ती,हातापायाला थोडं खरचटलं होतं,गुढघ्याला जखम झाली आहे.पण तानाजीच्या डोक्याला मार लागला होता.यादव सरांनी काही ऐकलं नाही,ते घाईत घेवून गेले मुलीला किशनचंद हॉस्पिटलला.मला आणि कुलकर्णीला कॅश दिली आणि बघायला सांगितलं तानाजीकडे.डॉक्टर बोल्ले,केस सिरीयस आहे,ऑपेरेशन करायला लागेल.,आणि तिथले मशीन खराब होतं.बाहेरच घेऊन जा म्हणाले.पोलीस कम्प्लेंट पण झाली होती पण यादव सरांनी ते मिटवल’.
“जाधव मला एक सांगा,कि अॅक्सीडेंट नेमका कसा आणि कोणामुळे झाला?
‘सर कोणाला सांगू नका,पण सरांच्या मुलीची चूक होती,तानाजी तिला हाताला धरून शाळेच्या इथल्या फुटपाथवरून चालत असतानाच ती काहीतरी दिसलं म्हणून तानाजीचा हात सोडून रस्त्यावर पळाली.समोरून ट्रक येताना दिसला म्हणून तानाजी फक्त पटकन तिला वाचवायला म्हणून गेला.तिला घट्ट धरून जाताना गाडीची धडक बसून तो रस्त्यावर पडला पण त्याने मुलीला अलगद बाजूला ठेवलं’
“ओ माय गॉड,म्हणजे तानाजीची काही चूक नव्हतीच तर ?
‘हो सर बिलकुलच नव्हती,मुलीने आणि रस्त्यावर अॅक्सीडेंट बघणाऱ्या माणसानीपण असंच सांगितलं हे सगळं,तिला बाजूला ठेवून मग बेशुद्ध पडला ते अजून तसाच आहे’.
त्याच्या हातावरून गाडी गेली,हाडं मोडल्येत आणि डोक्याला धक्का बसलाय.
“बापरे मग शेवटी कुठे घेवून गेलात त्याला?आत्ता काय स्टेटस आहे?”
सर ते दीनदयाळ आहे ना तिकडे नेलं शेवटी.अजून कोणी घेतच नव्हतं.वेळ पण जात होता.मग यादव सरांनी दिलेले दहा हजार भरले.आणि उपचार सुरु केले.आता स्टेबल आहे.पण डॉक्टर म्हणतायत ऑपेरेशन करायलाच लागणारे.
“दिनदयाळला?नेमक ऑपेरेशन आहे?कोण आहेत डॉक्टर?”
डॉक्टर के.के.शिंदे म्हणून आहेत.तिथले मेन न्यूरोसर्जन आहेत.ते बोलतायत,केस क्रिटीकल आहे,मेजर आहे ऑपेरेशन.हाय रिस्क आहे.हॉस्पिटलचा क्लार्क बोल्ला,डॉक्टर खूप बिझी असतात.बिल आत्ताच पंचवीस हजार झालय.पेशंटच्या पेमेंटचा भरवसा कोण देणार?आजकाल ह्या क्लासमधल्या मराठी माणसाला काही झालं तर लगेच तोडफोड करतात असं हॉस्पीटल स्टाफ बोलतो..
“मग तुझे यादवसर नाही का काही बोल्ले?मी जाधववर उगाचच राग काढत म्हणलो.
‘यादवसर म्हणले,म्हणजे आधीचे दहा हजार तर त्यांनीच दिलेत,पोलीसच त्यांनीच मिटवल.आता बाकी कंपनी काय देते बघू म्हणतायत.’जाधव काही न समजून उलट यादवचीच बाजू लावत म्हणला.
“बुलशीट.हे सगळं त्याच्या पोरीला सोडायला गेला म्हणून झालंय ना?आणि त्या पैश्याच्यासाठी काय एका माणसाचा जीव घालवणार आहात का?आणि कंपनी अॅप्रुव्हल देणार त्यावेळी बघू म्हणजे काय?
तानाजीला घरच्या कामाला पाठवताना काय कंपनीच्या हेडऑफिसची परवानगी घ्यायला गेला होता का यादव?आणि ह्या क्लास मधल्या मराठी माणसाला म्हणजे काय?माय फुट..उगाचच काहीतरी फालतूपणा करू नका म्हणावं.बिल सगळं भरू आपण.आता मी आलोय,बोलतो डॉक्टरांच्या बरोबर.नाव काय म्हणलात होतात तिथल्या मेन सर्जनचे जाधव?”
‘केके शिंदे सर’
“ओके.केके शिंदे?”
अरेच्च्या केके शिंदे म्हणजे आपला किश्या?किश्याच असणार.किशोर कृष्णराव शिंदे.आयला शाळेतली पाच आणि नंतर ज्युनियर कॉलेज आणि हॉस्टेलची दोन अशी आख्खी सात वर्ष एकत्र काढल्येत आपण.नंतर आपण इंजिनिअर आणि तो डॉक्टर.किश्याच असेल तर बास कामच झालं.असेल काय तोच असणार.मागच्या रीयुनियनला म्हणाला होताच आता परत आलोय युएस वरून,इकडेच कुठेतरी जॉईन होतोय म्हणून.हे बेस्ट झालं.चल किश्या असला म्हणजे एका बाजूची काळजी मिटल्यात जमा.आता पुढच्या हालचाली लगेच करायला पाहिजेत.यादवच्या मिटींगला आहेत अजून १५ मिनिट.
”जाधव नंबर आहे का डायरेक्ट डॉ.शिंदेंचा?नसेल तर हॉस्पिटलला लावून डॉ.शिंदेंना द्यायला सांगा बाहेर टीनाला.कमॉन हरीअप नाऊ.”
आईशप्पथ,अजून काय घोळ घालून ठेवलेत अजून ह्या यादवरावांनी कोणास ठाऊक?
‘सर,डॉ.शिंदे ऑन द लाईन’
“ओके,येस डॉ.केके शिंदे ना?सर धिस इज रोल नंबर एटीन शेखर जोशी हिअर.”
‘शेखऱ्या तू ?माय गॉड,व्हॉट अ कोइंसीडन्स.बिलीव्ह मी ऑर नॉट.आजच सकाळी तुझी आठवण काढली होती गावाकडून लाडू भरून डबा आला तेव्हा.बायकोला म्हणलो सुद्धा.आठवतंय ना हॉस्टेलला माझ्या घरून कशाचाही डबा आला कि सगळ्यात आधी तू लंपास करायचास?
“अरे हो,पण परत देताना बरोब्बर अर्धा शिल्लकही ठेवायचो ते नेमकं वहिनीला सांगितलं नसणार तू?”
‘हाहाहा’. ये रात्री घरी,आज मी ठेवतो तुझ्यासाठी अर्धे लाडू शिल्लक.’
“हाहाहा.त्यावेळी मावशीनी केलेले लाडू पहिल्यांदा हातात लागले असते तर ठेवले असतेस का माझ्यासाठी?आणि आता न ठेवायला काय झालंय तुला?साल्या आता तू अमेरिकेत जावून कॅलरी कॉशस वगेरे झाला असणार ना! त्यातून लीडिंग सर्जन...काय ?”बर ते जावूदे.मी आत्ता वेगळ्याच कामासाठी
फोन केलाय तुला.”
‘आज्ञा करा मिस्टर रोल नंबर एटीन.’
“अरे किश्या,माझा एक जवळच्या माणसाला अॅडमीट केलंय तुझ्या हॉस्पीटलला.आणि केस पण तूच बघतोयस असं समजलं.”
‘बापरे ,कोण रे?
“तानाजी गवळी,ऑफिसमधला आहे रे आपल्या.चांगला आहे पोरगा.घरचाच आहे समज.”
‘ओह्ह माय गॉड,ती केस?बरीच क्रिटीकल आहे रे शेखऱ्या,बट वी आर ट्राइंग हार्ड,आतातर तू आहेस म्हणल्यावर काही प्रश्नच नाही.पण मग तू कुठे होतास २-३ दिवस?त्याची बायको एकटीच बसलेली दिसत होती इथे.घरी दुसरं कोणीच नाहीये म्हणे त्याचं?
“अरे मी पण सिंगापूरला होतो आठवडाभर.आजच आलोय सकाळी ऑफिसला,त्यावेळी समजलं मला.ते सांगतो नंतर.मला एक सांग हा तुझ्या हॉस्पिटलला बिलपेमेंटचा इश्यू काय असतो रे येवढा?आमच्या माणसांना बरंच उलटसुलट ऐकवलं तुमच्या माणसांनी.बिल मी काढून देतो हॉस्पिटलचं.यु डोंट वरी.फक्त त्यासाठी उपचार नका थांबवू यार”.
‘अरे आजकाल डॉक्टरच्या हातात कुठे असतात ह्या गोष्टी?आणि मॅऩेजमेंट म्हणजे कशी असते माहित्ये ना तुला?तसच असत रे ते.पण ते सोड तू आता,मी सांगून ठेवीन.भेटतोयस कधी ते सांग लेका? रीयुनियनला जेमतेमच भेटलो होतो आपण.’
“अरे कधी काय आजच संध्याकाळी येतो हॉस्पिटलमध्ये.पेशंटला पण बघायचं आहेच.”
‘ओके ये,थांबतो मी इथेच.चल भेटू’
चला आता ऑपेरेशन यादव ...
“हाय टीना आय अॅम विथ यादव नाऊ.मोस्टली विल नॉटबी इन केबिन टुडे”
“हलो अंदर आ सकता हू यादव सहाब?
‘अरे मालिक धन्यभाग हमारे,आईये आईये,बैठीये प्लीज,कॉफी फौरन मंगवाऊ?बस आपके लिये रुका हू’
जस्ट अ सेक’
‘सेंड टू कॉफी इन’
हा बोलिये सहाब,हमारे लिये क्या लेके आये सिंगापोरसे ?
“हाहाहा”
‘जोक्स अपार्ट,ऐसी नयी चीजे सबसे पहेले देखनेको जाना हो तो बास सिंगापोर,टचवूड’
“हां,बिलकुल सही है”
‘खैर छोडो,लेट्स कम टू पॉईंट,सो व्हॉटअबौट मिरचंदानी?क्या किया जाय?’
“करना क्या है यार? उसकी तो आदत है,हम दोनोमेसे एक को पकडके हर बार अपनी प्राईस लेताही है,लेकीन इस बार वी नीड बी युनायटेड”
‘येस ऑफकोर्स,आपही लीड लेलो,मै केह्दुंगा के प्राईसका इश्यू आप जोशीसहाबसे डीस्कस करलो,विल इट बी फाईन?’
“कोई दिक्कत नै,लेकीन अगर आपको लीड लेना हो तो ..”
‘अरे कहां सहाब मुझे फसा रहे हो आप?यु नो हिम बेटर,आखिर सिनियर तो आपही हो यहाके?’
आयला इथे आठवते का ह्याला सिनियोरीटी?आणि इतरवेळी परस्पर डीसिजन घेवूब मोकळा,आताही आपण टेंडर मिळवल्यानंतर रिपोर्ट हा करेल आणि क्रेडीट घेवून जाईल.काय करावं?
“यादवसहाब,आय सजेस्ट,हाऔ अबौट ईफ धिस टाईम वी विल चेंज आवर रोल्स?आय विल कीप रिपोर्ट टू एचओ.और आप मिरचंदानीसे रेटके बारेमे डीसीजन लेलो?वैसे तो आपही ब्रांचहेड हो.आप बोलदोगे तो एक तऱ्हासे फायनल होगा उसके लिये.तो आगेकी टेंडरकी प्रोसिजर फास्ट करदेगा.यु नो व्हॉट आय मीन?”
‘गॉट इट’
“ऐसेही ठीक रहेगा मेरे खयालसे”
‘बट डू यु रिअली थिंक लाईक धिस जोशी?’
“ऑफकोर्स यार यादव”
‘ओके ऐसेही करते है.डन’
“डन”
‘चलो इस बातपे कॉफी होजाये,और बताव?’
“बस तुम बताव यार,हम तो थे नही यहां,कुछ खास?”
‘अरे यार,माझ्या पोरीला अॅक्सीडेंट झालं,तो आय व्होज अल्सो बिझी?’
(आता नाटक करायची खरी वेळ आली)
“अरेयार .आत्ताच कोणीतरी म्हणल मला.मी विसरलो आल्यावर विचारायला? हौ इज शी नाऊ
अॅक्सीडेंट कसा झाला?”
‘अरे यार,ती स्कूलमधून येत होती,अचानकसे कुठल्या गाडीने येवून रस्त्यामंधीच तेला ठोकर मारली.बट नाऊ शी इस फाईन’
“अरे यादव,मी ऐकलं आपला प्यून तानाजी तिला आणायला गेला होता?रिअली?”
‘अरे हां यार थोडा..ते दिवशी घरची गाडी गराजमंधी रीपेरला गेली होती ,वाईफबी बिझी होती.जरा रीलायबेल आदमी है.म्हणून पाठवला,बघ ना काय करून ठेवला?
“म्हणजे चूक तानाजीची होती?पक्का?”
‘बिलकुल.ऑफीसमंधी कोनी काय बोलला काय?’
“यार,हे बघ यादव.. पोरगी तर लहान आहे.पण तिनी काही केलं तर जवाबदार तर आपण असतो ना?
‘हां बिलकुल.तभितो..देखो ना,मी सोता दस हजार हॉस्पिटलमंधी भरले.वरती पोलीसला पण सगळ सांभाळायला लागलं वो अलग
“यादव,एक बोलू का ?देखो गलत मत समझना”
‘हां सर बिलकुल बोलिये’
“सी यादव,अॅक्सीडेंटच्या बद्दल मला सगळं समजलंय”
‘ओह्ह’
“बघ,तू कंपनीच्या माणसाला ऑफिसच्या वेळेत घरच्या कामासाठी पाठवलास,त्याचा अॅक्सीडेंट तुझ्या मुलीच्या चुकीनी झाला आणि आता तो सिरीयस आहे.त्यामुळे जवाबदारी तर तुझीच आहे ना मॉरली?हि गोष्ट एचओला समजली तर तुझी ट्रान्स्फर कुठेहे होवू शकते हे माहित्ये ना?सोच लो.”
‘अरे यार जोशी,पण गाडीखाली आला ह्यात तर त्याचीही चूक आहे ना..?’
“बघ यादव,आता बास झालं.एकच सांगतो तानाजीची चूक एकच आहे त्याने तुझ्या मुलीला वाचवायचा प्रयत्न केलाय.आणि सगळी केस मला नीट माहित्ये.त्यामुळे आता कुठलेही मलातर कुठलेच कारण देवू नकोस”
‘बघ जोशी,माझी तुझी काही दुष्मनी नाय.तू ही गोष्ट कोणाला बोलू नको’
“यादव मला बाकी काही माहित नाही.पण ह्यात ऑफिसचे नुकसान आहेच.त्यामुळे काही झालंतर मला वरती रिपोर्ट करायलाच लागेल.त्यापेक्षा आत्ता तुझे काही पैसे जातील.पण माणसाचा जीव वाचेल.”
‘जोशी हे बरोबर नाय हां.तू आपल्या कलीगला त्या प्यूनकरता बदनाम करणार? धिस इज नॉट डन यार ‘
“यादव,एक लक्षात .घे तो पोरगापण आपलाच आहे,त्याच्या आयुष्याचा सवाल आहे.तू एक कामा कर,तू त्याच्या सगळ्या उपचाराची जवाबदारी उचल.त्याला अधेमध्ये काही झालं तर त्याच्या बायकोला त्याच्याजागी आपल्या ऑफिसमध्ये कामाला लावून घ्यायची कबुली दे,मी हे प्रकरण वरती नेत नाही.”
‘लुक जोशी,हे नियमात बसत नाय.’
“यादव,नियमाच तू मला सांगू नकोस.ऑफिसमधल्या प्युनला घरच्या कामासाठी पाठवणे पण आपल्या नियमात बसत नाही,हे लक्षात ठेव.तो माणूस प्यून जरूर आहे,पण ऑफिसकरता काय वाट्टेल ते करतो तो.त्या मावळ्याला मी तुझ्या एका चुकीमुळे फुकट मरून देणार नाही”
‘व्हॉट मावळा? म्हणजे काय ? ‘
“जावूदे यादव,वो समझाना तेरे बस कि बात नही,साले तुम्ही कायम मोगलांना राजे मानत आलात ना हाच तुमचा प्रॉब्लेम आहे.बेसिकमधेच गडबड असताना मी काय बोलणार ?
फायनल सांगतो,आयदर त्याची सगळी जवाबदारी घेणार हे मला लिहून दे,नाहीतर मी आत्ताच्या आत्ता वरती रिपोर्ट करतो.आय थिंक यु नो माय रेलेशंस विथ रेड्डीसाब ? “
‘जोशी,चल छोड यार.घेतली सगळी जिम्मेदारी,टेक माय वर्ड .यार लेकीन तू एक प्युनके लिये मुझसे लडेगा ये मैने कभी सोचाभी नहीथा यार.एक बात है तुम मराठी लोगोमे जब एक होतेहो ना; तो बहोत जिगरसे लडते हो.हॅटस ऑफ टू यु पिपल ‘
“छोड यार यादव.शिवाजी महाराजांची माणस आहोत आम्ही.तानाजींची कदर आम्ही नाही करणार तर कोण करणार?फक्त एक व्हायचं असतं तिथेच घोडं पेंड खातं आमचं आजकाल”.
काय खरय ना ?

समाप्त
©अंबर कर्वे  
#कथा_भाग_2











मावळा - कथा  

सकाळपासून फोन फोन.पाच सहा दिवस सुट्टी घेऊन सिंगापूरला गेलो काय आल्याआल्या भंडावून सोडतात नुस्ते. गाडी लावून ऑफिसच्या बिल्डींगमध्ये शिरताना कायम दिसणारा रोज गुड मॉर्निंग सर म्हणणारा,आपली रोजची पत्र वरच्या मजल्यावर पोचवणारा लिफ्टमन कम प्यून तानाजी दिसत नाही.आपला प्रश्नार्थक चेहेरा बघून त्याच्या जागी बसलेला भैया प्यून आपणहूनच सांगतो .
“ सहाब बिमार है वो,अस्पतालमे है,आयसीयू मे.लास्ट स्टेजपे है बोलते है,उसकी बिवी बडेसाबके पास आईथी कल सुबेह,रोते हुवे चलीगयी”.
कायम परीटघडीच्या कपड्यात,हसतमुखानी सगळ्या ऑफिसस्टाफची सगळी कामे करणारा तानाजी लास्ट स्टेज ला ४-५ दिवसात?केबिनकडे जातजातच डोक्यात तानाजीचेच विचार घोळायला लागले.
काही होवू शकत बुवा आजकाल !!
 दहा वर्ष तरी झाली असतील ना त्याला कामाला लागून,कंपनीमध्ये कधीच परमनंटझालाय.सगळ्यांची वित्तंबातमी असूनही,पण काड्या न लावता सगळ्यांच्या आनंदात सहभागी होणारा हरकाम्या तानाजी .ऑफिसमध्ये कोणाला मुलबाळ झालं कि हक्कानी त्यांच्याकडे जाऊन पैसे मागून घेऊन बाहेरून पेढे,बर्फी आणून सगळ्या ऑफिसस्टाफला खुशखबर सांगत आनंदानी स्वतःच्याच घरी पाळणा हललाय असं वाटावं एवढा खुश होणारा,ऑफिसच्या वार्षिक दिनाला सपत्नीक येऊन बायकोशी आवर्जून ओळख करून देणारा तानाजी.त्यावेळी आपल्या बायकोनी आपुलकीनी केलेली चौकशी लक्षात ठेऊन दर राखीपौर्णिमेला ,भाऊबीजेला आपल्या मोबाईलवर “साहेब,ताईंसाहेबांना नमस्कार सांगा” म्हणणारा तानाजी.
त्याला स्वतःला मुलबाळ काहीच नाहीये. हो..चांगलंच आठवतंय.म्हणत होता मला.,गावाकडे जाऊन देवीला नवस बोललाय.बहुतेक मागच्याच वर्षी.
एकदा आपल्या मुलाला शनिवार ऑफ असताना काहीतरी अर्जंट कामाकरता घेऊन थोड्या वेळाकरता ऑफिसमधे सकाळी घेऊन  गेलेलो असताना “बघ हे आख्खं ऑफिस तुझ्या पप्पांच” असं म्हणत कडेवर घेऊन म्हणत हिंडवून आणलं होतं वरती हौसेनी खाली जाऊन एक ‘फाईव्ह स्टार’ कॅडबरी आणून दिली होती त्याला.इयरएंडला स्वतःचं काम काही नसताना फक्त स्टाफला रात्री उशिरापर्यंत चहा,कॉफी देण्याकरता थांबणारा.रात्री जाताना आपल्या ऑफिसला किती फायदा झाला विचारणारा,काहीही सांगितलं तरी खुश होणारा.दसर्याला न चुकता ऑफिसला झेंडूच्या फुलांच्या माळा करून लावणारा,ऑफिसच्या सगळ्या गाड्या चकाचक धुवून ठेवणारा,”झक्कास दिसतायत हां गाड्या तानाजीराव” म्हणलो कि स्वतःशीच खुश होवून हसणारा तानाजी.
  आणि ह्या दिल्लीवरून मागच्याच वर्षी बदलून आलेल्या आपल्या सुपरबॉसनी,यादवनी झटक्यात त्याला मदत नाकारावी? विचारायलाच पाहिजे ह्याला,सिनिअर बॉस असला म्हणून काय झालं? आपली ऱँक तर एकच आहे.विचारू शकतो आपण त्याला.काही झालंतरी इथला सगळ्यात सिनियर मीच आहे की?
नियमात बसवता येतं एकदा ठरवलं तर.मागच्या वर्षी ह्या यादवनीच तर त्याच्या गाववाल्या सिनिअर क्लार्क विजेंदरसिंग करता घेतलं ना अप्रूव्हल हेड ऑफिसकडून?त्याला तर कंपनीत चिकटून जेमतेम ३-४ वर्षच झाल्येत.आधीच्या ब्रांचहेड रेड्डी साहेबांनी तर त्याला ३ मेमो दिले होते. कामचुकार स्साला.आता तानाजी करता आपणच लढाई लढलीच पाहिजे .आपण नाहीतर कोण करेल त्याच्याकरता? छे..लास्ट स्टेज म्हणजे म्हणजे काहीतरीच..नसेलही येवढं काही.आधी एकदा खात्री करून घेऊ.कोण सांगू शकेल बरं?जाउदे आता पहिल्यांदा पेंडिंग कामं थोडी उरकू,मग बघूया.
आज मेल्सचा नुस्ता ढीग लागलेला असणारे.माय गॉङ ...२०००+ मेल्स .सर्व्हर ढेपाळलाच असणार.तरी न विसरता ‘व्हेकेशन रीस्पोंस ऑऩ’ ठेवला म्हणून बरं.तरी सगळं सॅग्रीगेशन करण्यातच अर्धा दिवस जाणारच.”गुडमॉर्निंग टीना.नो कॉल्स टील आय से,ओके?”
वाजलेच कि .कधी दुपारचे २ वाजले समजलंच नाही.आता बघू कर्णिकला विचारून .त्याला नक्की माहिती असेल तानाजीची केस.एच.आर.हेड म्हणून त्याच्याकडे आलीच असणार तानाजीची केस.
टीना प्लीज कनेक्ट मी टू एस.आर.के प्लीज..हा कर्णिक?
कधी येणारेत परत?ओके.च्यायला,ह्या कर्णिकला आत्ताच जायचं अडलं होतं का वैष्णोदेवीला ?
ओके देन कनेक्ट मी टू ..लिव्ह इट,आय विल मॅनेज.थॅक्स...
हल्लो यादव,जय राम जी की सहाब,कैसे हो?ऑल वेल?येस सिंगापोर वॉझ ऑसम अॅज युज्वल.कॉन्फरंस तो बस  बहाना होता है यार ,यु नो ऑल दोज थिंग्स.
 “..” ..
हा सही है.हाहाहा ..
“हॉटेलतो बढीया था यार.हा बच्चेको भी इस बार साथ लेके गये थे.ओके बाय द वे.. वो मिरचंदानीके टेंडरवाला इश्यू डिस्कस करना है.लेटस हॅव अ कॉफी टूगेदर?यु सजेस्ट.आय अॅम ओके.अभी दस मिनिटमे भी आ सकता हु..
“..”
“ओके च्यल,आताहू आधे घंटे मे.सिया”
आता कोण ?हां तो जाधव ओळखतो तानाजीला चांगला.
“टीना सेंड मिरचंदानी टेंडर हार्डकॉपी विथ जाधव इमीज्येटली.”
आयला घोटभर पाणी प्यायला वेळ नाहीये सकाळपासून
‘मे आय कम इन सर?’
“हां जाधव याया.बघू फाईल आणि बसा जरा.
काय घेणार? चहा,कॉफी?”
‘नको सर,बास फाईल द्यायला सांगितली होती’
“ ती दिलीत जाधव,वेगळ विचारायचं होतं तुम्हाला.अरे आपल्या तानाजीच काय झालंय रे नेमकं?”
‘अं ? सर ते ..’
“हां बोलबोला बिनधास्त बोला सगळं”
‘सर त्याला अँक्सिडेंट झाला ३ दिवस झाले.’
“ओह्ह काय सांगताय?कसा काय? गाडीवर ?”
‘सर नाही.. ,तो यादव सरांच्या मुलीला सोडून येत होता,त्यावेळी”
“ओ माय गॉड”
( भाग १ - क्रमशः )  #कथा_भाग_1


Monday, 1 February 2016

बघा तुम्हालाच कसं वाटतंय !!
रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर,एखाद्या ‘कुटुंबाची’ गाडी बंद पडलेली दिसली तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा.मदत पाहिजे असेलच असं नाही पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल.
नंतर बघा ,तुम्हालाच कसं वाटतंय !!
भरपूर ‘व्हर्चुअल’ मित्र,मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा,पण कधी एखाद्या खर्या मित्राने बर वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर’ म्हणून बघा.खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना ? 
नंतर बघा ,तुम्हालाच कसं वाटतंय !!
हल्ली लग्नसमारंभात प्यायच्या पाण्याची सोय नंतर एकाच ठिकाणी असते.
तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून,नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा 
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?
नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा.त्याचा तर दिवस चांगला जाईलच.
पण नंतर बघ,तुम्हालाच कसं वाटतंय !!
लहान मुलांसोबत दिवसभर ‘इडियट बॉक्सला’ सुट्टी देऊन,आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी मुलांनाही ऐकवा.पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना ?तुमची उजळणीही होईल.
आणि नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात,दरवेळी गाडीतून नाही उतरता येत,पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल, येवढंतरी करून बघा.रस्ता तर चालणार्यांचाही असतो ना?फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला.. 
पण नंतर बघा ,तुम्हालाच कसं वाटतंय !!
नेहमीची कार सोडून कधीतरी बाईकवर एकटेच निघून बघा मनपसंत हायवेला 
सुम्माट स्पीडने मोजून करा ओव्हरटेक २०० ट्रक,१०० बसना,त्याच जुन्या उत्साहात.आल्यावर चेहेरा माखलेला असेल धुळीने,धुराने.
शिव्या पण खाल्ल्या असतील ४ गाडीवाल्यांच्या ..
तरी नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर,अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून १० वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघातर उगाचच सांगून 
“मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका”
तो मनाशीच हसेल ओशाळल्यासाखा!!लाजून म्हणेल,”पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो,पर नक्की यायाच”!!जाताना त्याला शेकहँड करा न चुकता.व्यावसायिक तर तोपण आहे ना ?
मग बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये,त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा बिनामतलब तंगड्या हलवत,गाणी म्हणत बसून बघा.एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..
नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार ?
नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
आपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा.पैसे नाही लागत त्याला जास्त ..
पण नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
ऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच टेरेस किंवा बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे,चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर.खरा सुगंध तर तोच असतो ना ?
नंतर सांगा,तुम्हालाच कसं वाटतंय !!
‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जून उघडा ठेवा,
ती ‘स्त्री’आहे म्हणून नाही,पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून !!!
हे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है !!
पण नसाल करत तर नक्कीच करून बघा..
नंतर सांगा,तुम्हाला कसं वाटतंय !!
©अंबर कर्वे 
पूर्वप्रसिद्धी  -लोकसत्ता ब्लॉग - २२.९.२०१५