Monday, 11 January 2016

खादाडी पुण्यातली ९० च्या वेळेची (भाग २ ) 
क्रमशः
तसा पेरूगेट भावेस्कूल समोर अजूनही असलेल्या ‘लक्ष्मी विश्रांती गृह’मध्ये बटाटे वडा सुरेख मिळायचा.सणसणीत आकारचा कायम गरम मिळणारा वडा,त्याबरोबर भरपूर मिरची आणि लसूण घालून ताजी केलेली भुकटी सारखी चटणी.१९९० पर्यंत हा आत्ताच्या भाषेत ‘जंबो वडा’ एक वडा केवळ १ रुपयात मिळायचा.पुढे पेरूगेट चौकात असलेलं मानकर ह्याचं आताचे ‘गोपी नॉनव्हेज’ तेव्हा ‘प्युअर व्हेज’ होतं.तिथे मिळणार्या वडासँपल,आणि मिसळीकरता आसपासची कॉलेजची आणि नोकरदार दुनिया एकवटायची.रेट माफक असल्याने विशेषतःपेरूगेट भावेस्कूलचे आणि ज्युनिअर कॉलेजचे कुमार लेक्चर ‘बंक मारून’ इकडेच सापडायचे.नंतर समोर अमृततुल्य मधला चहा हमखास.
स.प.समोरचं ‘उदयविहार’ स.प.एवढेच धो धो चालायचे(नंतरनंतर त्याच्या बेसमेंट मध्ये कॅरम खेळणाऱ्या “खेळींच्या” रांगा जास्ती लागायच्या) त्याच्या शेजारीच असलेल्या छोटेखानी ‘लवाटे snacks चा त्यावेळेच्या सदाशिव पेठेत ब्रेडआम्लेट आवडणार्यांना आधार होता.नाहीतर स.प.पोस्टाच्या बाहेर बोळात,ठराविक दिवशी, विशिष्ट पदार्थ मिळणारी टपरी(नाव पुन्हा विसरलो) त्याच्याकडे पायनापल शिरा,मिसळ,सगळेच पदार्थ खास.
आताच्या ग्राहक पेठेच्या जागेत पूर्वी असलेले ‘जीवन’तोपर्यंत काळाच्या पडद्याआड गेलं होतं.आणि टिळक स्मारकच्या अगदी चौकात असलेलं ‘मुक्ता’ कॉलेजियन्स मध्ये फार कमी काळात‘ हिट’ झालं होतं.टि.स्मा.चौकात असलेल्या बादशाही (पूना रिफ्रेशमेंट ) मधले उपवासाची कचोरी,कोथिंबीरवडी सारखे खास महाराष्ट्रीय पदार्थ खायला बाहेगावातून नोकरी निमित्त आलेले नोकरदार लोक आवर्जून यायचे(अजूनही जातात) आताच्या एस.पी.ज बिर्याणी च्या जागी त्याच नावानी व्हेज हॉटेल सुरुवातीला काही वर्ष होतं. तिथे वरती असलेल्या family रूम मध्ये ग्रुपमधल्या पोरींना नेवून पार्टी देणे म्हणजे स.प मधल्या मुलांना एकदम प्रेस्टीज असायचं.
रमणबाग चौकात अगदी ५-६ वर्षापूर्वीपर्यंत सुरु असलेलं ‘किस्मत’ हे पण जळजळीत मिसळीकरता तिखट खाणाऱ्या जमातीमध्ये मापदंड म्हणून प्रसिद्ध होतं.पलीकडे केसरी वाड्याच्या समोरच असलेलं ‘प्रभा’ तेव्हा त्यांच्याकडे मिळणार्या पातळ रस्सा,ब्रेड ,चटणी आतच घालून केलेल्या बटाटा वड्याकरता,आणि उपासाच्या कचोरी करता एकदम पुरातन काळापासून फेमस.आता तेवढी कचोरी बनवणं त्यांनी बंद केलं. बाकी चव अगदी तशीच.प्रभाच्या समोरच महिला बचत गटाने चालवलेले ‘सुगरण’ म्हणजे नाश्त्याच्या पदार्थांपासून ते पोळीभाजीपर्यंत सगळे पदार्थ पुरवणारं हमखास ठिकाण.तिथून थोडसंच पुढे रमणबाग चौकाकडे जाताना छोटेखानी ‘अरविंद कोल्ड्रिंक हाउस’ तिखट रस्सापाव ह्याकरता दर्दी खवय्ये मंडळीत फेमस होतं.नूमवी शाळेच्या शेजारी संतोष भुवन मध्ये 
शनिवार पेठेत अहिल्यादेवी हायस्कूल समोरच्या ‘रामदास’मध्ये रस्सा आणि स्लाईस खायला शनिवार पेठेतल्या सगळ्या शाळेत मुलांना सोडायला येणाऱ्या तमाम रिक्षावाल्या काकांची नेहमीच गर्दी असायची.
कुमठेकर रस्त्यावरचं ‘स्वीटहोम’ म्हणजे सहकुटुंब जाण्याचे प्रमुख ठिकाण होतं.’स्वीटहोम’मधल्या साबुदाणा खिचडीवर भरपूर कोथिंबीरीची पेरणी असायची.तिथली इडली विशेषतः सांबार आणि त्याच्यावर बारीक शेव घालून, म्हणजे तर अगदी इडलीची खास पुणेरी चव. तिथेही सगळे नाश्त्याचे पदार्थ उत्तम मिळायचे.कुमठेकर रस्त्यावर जोंधळे चौकातल उडपीच्या आण्णाचे ‘गणेश’ तेव्हा बहुतेक नुकतच सुरु झालं होतं.त्याच्याकडे मात्र टिपिकल उडपी चवीचे इडली सांबार त्यावरती मुबलक खोबरं घातलेली ओली चटणी घालून मिळायचं.नाहीतर झटपट मिळणारा डोसा,उत्तप्पा खावून नोकरदार पटकन आपली दुचाकी बाजूला लावून खावून घ्यायचे.पण त्याच्या पेक्षा जास्ती गर्दी पलीकडच्या ‘प्रभाकर बेकरी’ मधले पट्टी सामोसे घ्यायला व्हायची.लोकं हे सामोसे घ्यायला त्यावेळी रांगा लावून थांबायचे.कुमठेकर रस्त्यावरच ट्रेनिंग कॉलेजच्या थोडं पुढे काही वर्ष ‘पेशवाई’ नावाचे हॉटेल काही वर्षे होतं,ते पण झकास चालायचं.
जिमखान्यावर राहणारे लोक डेक्कनवर अप्पाकडे सोमवार ,गुरुवार ,शनिवार काकडी ,खिचडीकरता गर्दी करायचे (आणि इतर वारी त्याच्याकडच्या बटाटेवड्याकरता)आणि गावात राहणारे खवैये लक्ष्मी रस्त्यावरच्या जनसेवा मध्ये.सोमवार ,गुरुवार,शनिवार,चतुर्थी आणि मोठ्या एकादश्या सोडून पुण्यात कोणी साबुदाणा खिचडी खात नाही असा त्यावेळी पुण्यातल्या हॉटेलवाल्यांचा सार्वत्रिक समज होता.
तुळशीबाग म्हणजे समस्त महिलावर्गाचे लाडके ठिकाण,पण ज्युनियर कॉलेजच्या दिवसात आमच्यासारख्या खादाडांसाठी तुळशीबागेची बाजीराव रस्त्याची सुरवात म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र पासून लक्ष्मी रस्त्याच्या तोंडाशी असणार्या काकाकुवा मँन्शन पर्यंत खाण्याची रेलचेल असायची.सकाळी घरगुती चवीची साबुदाणा खिचडी,उपीट,पोहे,बटाटे वडे हमखास मिळायचे ठिकाण म्हणजे हा परिसर.काकाकुवा मँन्शनच्या आत गेल्यावर समोरच एक छोटेसं हॉटेल होतं(नाव आता आठवत नाही)पण नाश्त्याचे सगळेच पदार्थ दुपारपर्यंत छान मिळायचे. 
पण त्याहीपेक्षा दरवाज्याच्या बाहेर एक काका बरेच वर्ष सकाळी ७ च्या सुमारास सायकलवरून घरून डबे भरून शिरा,पोहे,उपीट,साबुदाण्याची खिचडी (खिचडीचे वार तेच तत्कालीन पुण्यातले.. सोमवार,गुरुवार,शनिवार)असे घेऊन यायचे.सकाळी लवकर ऑफिसला जाणारे नोकरदार,रस्त्यावर साफसफाई करणारे कामगार इथपासून मंडई परिसरात ‘रूमवर’राहणारे असंख्य कॉलेजकुमार असे सगळेजण ते येण्याची चातकासारखी वाट बघत असायचे.ते दिसले कि त्यांच्या सायकलभोवती गराडा पडायचा.पेपरप्लेट मध्ये एकेक वाटी भरून फटाफट सगळ्या गर्दीची क्षुधाशांती व्हायची.मग हळूहळू अश्या डबे भरून नाश्त्याची सोय करणाऱ्यांची त्या परिसरात गर्दी व्हायला लागली.आणि ते लोण मग सगळ्या पुण्यातच पोचले.आता शहरातल्या सगळ्या प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळात असे नाश्ता घेऊन उभे असलेले डबेवाले दिसतात.
त्याच्यावरून अजून एक आठवण झाली.त्याकाळी आजच्यासारखे नाश्त्याचे स्वस्तात मिळणारे पदार्थ रात्री उशिरा मिळायचे नाहीत.विशेषतः कॉलेज मधल्या परीक्षेकरता ‘नाईट मारणाऱ्या’ विशेषतः होस्टेलमध्ये रहाणार्या मुलांना जर रात्री उशिरा,पहाटे जर भूक लागली(आणि ति हटकून लागायचीच)तर सरसकट स्वारगेट ,शिवाजीनगर एस.टी.Stand वर जाण्याचा प्रघात होता.खिशात उरलेल्या कमी पैशात खाण्याची त्याच्यापेक्षा आद्य ठिकाणे म्हणजे ‘मंडईमधले ‘मार्केट उपहार गृह’ आणि रात्रभर व्यवसाय करायचं ‘लायसन’ असलेलं लक्ष्मी रस्त्यावरचे गोखले हॉलच्या समोरचे ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांचे “अंबादास”.रात्री साधारण दीड-अडीच च्या सुमारास ह्या ठिकाणी जरा ‘एक्ष्ट्रा’ तर्र्री मारून खाल्लेल्या ‘जाळ’ मिसळ किंवा ‘सॅंपलपाव’ खाण्यातली अविस्मरणीय ‘गोडी’ फक्त “अभ्यासाकरता(किंवा त्यापेक्षाही अभ्यासाच्या नावाखाली) जागरण केलेल्या “त्यावेळेच्या पोरांनाच” समजेल.पैकी ‘मार्केट उपहार गृहात खाण्याच्या व्यतिरिक्त माणसांचे जे अपरात्री दिसू शकतात ते सारे ‘रंग’ दिसू शकायचे.तिथे पलीकडच्या अनोळखी माणसाशी त्याच्या आधी सुरु असलेल्या चर्चेत बिनदिक्कतपणे भाग घेण्याचा खास पुणेरी अधिकार फक्त एखादा चहाचा कप घेऊन मिळायचा.कधी गिर्हाईकांची चर्चा चांगली सुरु आहे असे दिसले तर दुकानात कॅशला बसलेले शेठ उत्सुकतेने स्वतः येवून त्यात तेवढ्याच पुणेरी अधिकारवाणीने उतरायचे.रात्री नाटक,गाण्याचे प्रयोग संपवून बरेच कलाकार,बडी नेते मंडळी आवर्जून ‘मार्केट’चा कानोसा घ्यायला आवर्जून हजेरी लावायची.
आणि ह्याउलट चित्र ‘अंबादास’ मध्ये.या,काही शिल्लक असले तर खा ,चहा प्या,पैसे द्या आणि निघा.पण सदाशिव पेठ आणि नारायण पेठेच्या मधोमध राहून, काहीशा अबोल झालेल्या ‘अंबादास धाकू निकम’ ह्यांच्याशी जर एकदा सलगी झाली तर त्या माणसासाठी वडासँपल,मिसळ खास राखून ठेवले जायचे.तर्री स्वतः अंबादासशेठनी येवून वाढली तर समजायचे तुम्ही त्यांच्या अगदीच खास गोटातले.दिवसभर ( १ ते ४ सोडून ) जी गर्दी शेजारच्या ‘उपाध्ये ह्यांचे जनसेवा दुग्धालय’इथे असायची तेवढी कदाचित थोडी जास्तीच रात्री ‘अंबादास’च्या आतबाहेर असायची.ह्याच्यावरून त्यांची महती पुण्यात नवीन असलेल्यांना लक्षात येईल.आता शेजारचे खिचडीसाठी रात्रभर साबुदाणे भिजवत ठेवणारे ‘जनसेवा’पण नाही ,आणि अंबादास धाकू निकम’ ह्यांचे ‘अंबादास’ पण नाही.
फर्ग्युसन,बी.एम.,Modern हॉस्टेल मधली दर्दी चहाबाज मुलं रात्री उशिरा शिवाजीनगर च्या न.ता.वाडी.च्या डेपो शेजारी असलेल्या ‘चाचा’च्या टपरीवर ‘चहा मारायला’चक्कर मारायची.फर्ग्युसन मधल्या मुलांना आसपास वैशाली,रुपाली तर कायमच होतंच.पण गेट समोरचं असलेलं ‘सवेरा’ आणि तुकाराम पादुका चौकाच्या पुढे असलेलं पै ह्यांचे ‘निरंजन’ म्हणजे तर कॉलेजमधल्या मुलांची हक्काची मेस.तिथे एकंदर उडपी पद्धतीचे बाकी पदार्थ पण चांगले मिळायचे.
८० च्या दशकात ८० फुटी झालेल्या शास्त्री रस्त्यावर,लोकमान्यनगर मधलं अभ्यंकरांच ‘अजंठा’ मधे किंचित तिखट चवीचे तर्रीवाले सांबार आणि इडली,मिसळपाव,सामोसे ,वडे,भजी असे माफक ऑप्शन असणारे पण त्याच्यामुळे त्यावेळी लोकमान्य नगर भागात कॉटबेसिस वर राहणाऱ्या कॉलेजमधल्या मुलांचं आणि नोकरदारांच नाश्ता करायचं हमखास ठिकाण होतं.
सिंहगड रोड वरच्या लोकांना हॉटेलमध्ये खायला विठ्ठलवाडी देवळाच्या कमानीच्या शेजारी असलेल्या हॉटेल ‘श्री.विठ्ठल’ मध्ये, नाहीतर थोडं चविष्ट खायचं असेल तर फक्त हिंगण्यातल्या ‘आनंद’चाच आधार होता.तिथल्या पुणेरी दही मिसळीचा आस्वाद घ्यायला मात्र दर्दी लोकं आवर्जून अगदी पुण्यातून यायची. त्यावेळेच्या हडपसर,बाणेर ह्या उपनगरात लहानसहान टपरीवर उकळ्या चहा आणि शेवचिवडा,फराळ करणाऱ्या लोकांसाठी धूळ बसलेल्या काचेच्या बरण्यात भरून ठेवलेले शेंगदाण्याचे लाडू असायचे.लहान मुलांकरता रावळगाव सारखी चॉकलेट भरून ठेवलेली असायची.त्यावेळेच्या काही टपर्या आता ‘परमिट रूम’ झाल्या आहेत.
सामिष खाणार्यांना मंडई मधले ‘दुर्गा’,शिवाजी रस्त्यावरचे ‘आसरा’ नाहीतर चित्रशाळा चौकाच्या जवळचे ‘आशीर्वाद’ इथेच जायला लागायचे(त्याच रस्त्यावर आता जवळपास १५-२० मांसाहारी हॉटेल्स आहेत)नाहीतर एकदम मॉडर्न कॅफेवाल्यांचे ‘बांबू हाउस’.मत्स्याहारी लोकांना बालगंधर्व चौकातले ‘कलकत्ता बोर्डिंग हाऊस नाहीतर डेक्कनवर पूनम हॉटेलच्या शेजारी असलेले ‘गोमंतक’ स्वस्तात मस्त.मासे खायची एकदम घरगुती सोय.
१९९०-९१ नंतर आमचं पुण खरोखरच खूप बदललं.चहूबाजूला विस्तारलं.उपनगरं तर कधी शहरात आली ते समजलंच नाही.त्याच्या बरोबर पुण्याने सामावून घेतली नव्याने आलेली लाखो माणसं.त्यांच्या खाद्यसंस्कृती.
त्याकाळी फक्त किर्लोस्करांच्या ‘ब्ल्यू डायमंड’मध्ये किंवा ‘कॅम्प’मधल्या मोजक्या ठिकाणी मिळणारे कॉंटीनेन्टल पदार्थ पुण्यात बहुदा फक्त प्रभात रस्त्याच्या सुरुवातीला असणार्या ‘दर्शन’मध्येच मिळायचे.अगदी स्टार हॉटेलच्या दर्जाचे,अजूनही मिळतात.पण आता जगातल्या प्रत्येक पद्धतीच्या खाण्याचे पदार्थ पुण्यात मिळतात,आणि पुणेकर ते खाण्याकरता आवर्जून त्या ‘थीम हॉटेल्सना’ भेटी देत असतात.चांगले असतील तर(च) त्यांचे कौतुक करतात.
चायनीज पदार्थांना आपल्याकडच्या हॉटेल्समध्ये कधीच मेनूकार्डवर पंजाबी पदार्थांच्या बरोबर मानाचे पान मिळालंय,पण त्याबरोबरच इटालिअन ,जपानीज,थाई,मन्गोलिअन,मेक्सिकन सगळ्या पद्धतीच्या हॉटेल्सची पुण्यात रेलचेल झाल्ये.
पण अस्सल खवैय्या पुणेकर मालवणी पद्धतीचे जेवण,कोल्हापुरी तांबडा,पांढरा रस्सा,बीडच्या पद्धतीची बिर्याणी, लोणी धपाटे हे सगळेच पदार्थ चवीने खातो.नागपुरी सावजी मटणापासून ,जळगावच्या भरीत भाकरी पर्यंत पुणेकरांना कुठलाही पदार्थ वर्ज्य नाहीये. दावणगिरी डोसा, नीर डोसा,इडीअप्पम,कोरी रोटी ते मॅकसिकन नॅकॊज,टॅकोजपर्यंत सगळ्याच पद्धतीच्या खाण्यावर तो तेवढ्याच प्रेमाने तुटून पडतो.खाण्यामध्ये पुणेकरांना कुठलीही जिल्ह्याची,राज्याची,देशाची हद्द पसंत नाही.
पूर्वी लक्ष्मी रस्त्यावरच्या हिंदुस्तान बेकरीचे,शनिपाराच्या शेजारच्या ग्रीनचे, आपटे रस्त्यावरच्या संतोष बेकरीचे ,जोगेश्वरीच्या समोरच्या बोळातल्या पुना बेकरीचे ‘पॅटीस’घ्यायला रविवारी गर्दी व्हायची.आता पॅटीस ऐवजी नव्याने उघडलेल्या अनेक 'कन्फेक्शनरीज' मध्ये ‘व्हेज पफ’ खायला आजची तरुणाई गर्दी करते.पण 'पूर्वीच पुण आता राहिलं नाही'च्या धर्तीवर त्या पफ ना आमच्या रविवार सकाळच्या ‘पॅटीस’ ची चव नाही.
खरा पुणेकर अजूनही मराठी पदार्थांच्याकरता जीव टाकतो,खास मराठमोळे पदार्थ शोधत शहरभर फिरत असतो,एखादे विशेष ठिकाण सापडले तर लगेच त्या ठिकाणावरून ‘फेसबुक स्टेटस अपडेट’,whatsapp वर मेसेज फिरायला लागतात.फारच चांगले ठिकाण असेल तर त्याकरता माफक कौतुकाचे एखादे ट्वीट केले जाते.त्या ठिकाणाचा वास लागलेले प्रामाणिक खवैय्या तातडीने आपल्या गाडी काढून तिथे हजेरी लावतो.त्या पदार्थांचा आस्वाद घेतो आणि बाहेर नव्याने होत असलेल्या गर्दीकडे क:पदार्थ असावा अश्या पुणेरी दृष्टीने बघत समाधानानी बाहेर पडतो.गाडीला किल्ली लावून घराकडे निघतो.
मनात मात्र पुढच्यावेळी कुठल्या हॉटेलमध्ये जावे ह्याचा विचार नकळतपणे सुरु झालेला असतो.
©अंबर कर्वे,पुणे
२१.१२.२०१५
खादाडी पुण्यातली ९० च्या आधीची ..
भाग १ 
पुण्याच्या पवित्र गंगा जमुना ,अर्थात मुळामुठेच्या पाण्यावर पोसल्या गेलेल्या पुणेकरांचा अंगभूत सडेतोडपणा ,ज्याला उर्वरित महाराष्ट्रातली तमाम जनता कुचेष्टेनी ‘खवचटपणा’ असे म्हणते ;
तो जास्त प्रसिद्ध? 
का..ज्या पुण्याच्या प्रशंसेला पात्र ठरून चितळेंच्या बाकरवडीनी पुढे साता समुद्रापार कीर्ती मिळवली ति जास्त प्रसिद्ध ?सांगणं अवघड आहे .
त्याचं कारण आहे. पुणेकर आणि खाण्याच्या पदार्थांचे असे काही मेतकुट जमलेलं आहे,कि त्यातून एकाला वेगळ करणं कुठल्याही बल्लावाचार्यालाही शक्य नाहि.
पुण्यात सुगरण गृहिणीची,बल्लवांची काहीच कमी नाहि.त्यांना शिकवणाऱ्या फूडक्राफ्ट,भारती,टिळक महाराष्ट्र विद्यापीठसारख्या नामांकित संस्था,क्लासेसचीही कमी नाही.अगदी पुरुषांना सगळा स्वयंपाक शिकवणाऱ्या मेधा गोखले बाईंचा क्लासही तुम्हाला फक्त पुण्यातच सापडेल.तरीही गेल्या काही वर्षात पुण्यात,शब्दशः शेकडोंच्या संख्येनी सुरु झालेल्या हॉटेलांच्या बाहेर,दररोज हजारो पुणेकर आपापल्या पाकिटातून,वॉलेटमधून किवा पर्सेस आणि क्लचमधून पैसे भरून ज्या पद्धतीनी ताटकळत उभे असतात त्याची तुलना खर म्हणजे गुरुद्वाराच्या बाहेर सच्च्या भाविकांनी थाळा घेऊन लंगरमध्ये रांगेत उभ राहावं त्याच्याशीच व्हायला हवी .
हे सगळं झालं कधी?इथे रोज रांगा लावायचं कारण काय ?किवा पुण्याबाहेरची जनता म्हणते तसं पुण्यातल्या लोकांच्या कडे स्वयपाक करतच नाहीत का?
असल्या समाजशास्त्रीय कारणात शिरायला आम्ही(सच्चे पुणेकर असूनही) तत्वज्ञानी बिलकुलच नाहि.
आम्ही दिवसातले बर्याच वेळ असतो घराबाहेर,त्यातून आम्हाला लागते रोज भूक. तुम्ही म्हणाल ति काय उर्वरित महाराष्ट्राला नसते का?तर असते आणि असुदेत.त्याचा आमचा काही काहीय्येक संबंध नाहीये.पुणेकरांना आपापली कारणे पटतात आणि पुरतातदेखील .
आणि तसंही न पुरायला ति कारणं म्हणजे काही रोजची वामकुक्षी नाही.
तर खरा मुद्दा आहे तो पुण्यात असलेल्या नानाविध पर्यायांचा .
पण जन्मजात पुणेकरांचा खरा विकपोइन्ट म्हणजे मराठी आणि इतर भारतीय पदार्थ.
मग ते सकाळच्या न्याहारीपासून,जेवणापर्यंत सगळेच.
पण पु.लं.च्या ‘आमच्या वेळचं पुणे आता राहिल नाही’च्या धर्तीवर बोलायचं झालं तर फार मागे नको जायला ,९० च्या दशकाच्या आधी पुण्यात आजच्या एवढे काहीच पर्याय नव्हते हेच खरं.
पुणेकरांना जर हॉटेलमध्ये डोसा खायचा असेल तर वैशाली,रुपाली,तुळशीबागेतले अगत्य,सारसबागेच्या जवळची विश्व,कल्पना ही जोडगोळी. काही ठराविक उडपी हॉटेल्स,बाजीराव रस्त्यावरचं नातूबाग चौकातले ‘वाडेश्वर’,पलीकडचेच ‘जगन्नाथ’, पुढे दक्षिणमुखी मारुतीच्या मागे असलेलं ‘शारदा’ नंतर डायरेक्ट गुंडू शेट्टी ह्यांचे मॉडर्न कॅफे.
जंगली महाराज रस्त्यावर ‘शिवसागर’ सारखा अपवाद सोडला तर इडली,डोसा मिळायची ठिकाणे कमीच होती.
तिकडे स्वारगेट च्या पुढे राहणार्यांना लक्ष्मीनारायणच्या जवळचं त्रिवेणी ,सेव्हन लव्ज चौकातले चंदन.
सातारा रस्त्यावरच्या लोकांना मित्रमंडळासमोरचे ‘राजमहाल’.
कोथरूडकडे राहणार्यांना तर फार काहीच ऑप्शनस नव्हते. नव्यानेच सुरु झालेल्या एम.आय.टी.कॉलेजच्या मुलांकरता नुकतीच सुरुवात झालेलं रत्नप्रभा (आता त्याजागी IDDOS आहे) नाहीतर मग पुढे वनाझच्या समोरच्या बाजूला नव्याने सुरु झालेले किनारा.नळस्टोप जवळचे स्वीकार साधारण ८८साली सुरु झाले,त्याच्या नंतर १-२ वर्षातच ‘समुद्र’.ह्या दोन्ही हॉटेलनी पुणेकरांची पदार्थ खाण्याची सगळी वृत्तीच बदलून टाकली असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.म्हणजे आधी पुणेकरांना पावभाजी सारखे पदार्थ खायला फक्त सारसबागच्या शेजारच्या स्टोलवर जायला लागायचे.तेही फक्त संध्याकाळीच.तेच आता अगदी दुपारी पण खाता यायला लागले.त्याच्या शेजारी बसून बरोबरची व्यक्ती खुशाल पंजाबी पदार्थ मागवून खायला लागला.त्याच वेळी तिसरा कोणी दहीवडा खाऊ शकायची सोय झाली.थोडक्यात दिवसभर तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळे पदार्थ एकाच ठिकाणी मिळायची सोय माझ्या बघण्यात तरी इथेच झाली.
त्यांनतर मात्र पुण्यात ह्या उडुपी पंजाबी हॉटेल्सच पेवच फुटलं.आता एकेका रस्त्यावर जागा मिळेल तशी हि हॉटेल्स उभी राहतात आणि वर्षानुवर्षे चालतात.
पण ९० च्या आधी पुणेकरांची आवडती मिसळ खायची असेल तरी ठराविक ठिकाण होती,म्हणजे टिपिकल पुणेरी मिसळ खायला नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळात बेडेकरांकडे, नाहीतर तुळशीबागेत जोशी ह्यांच्या श्रीकृष्णमध्ये. श्रीकृष्णमध्ये अगदी घरगुती लोणी लावून ब्रेड स्लाईस पण मिळायचा (त्यावेळी अमूल हे नाव कदाचित कोणी ऐकलंही नव्हतं)
मग लहान मुलांना दोघात एक अश्या प्रमाणात मिळणारी मिसळ खाऊन आम्हाला त्या ब्रेडची भूक लागायची. त्याच्यावर खास मुलांसाठी लोणी आणि वर थोडी साखर पेरून,त्या स्लाईसच्या आंब्यासारख्या ‘Artistic’ फोडी करून ,आणून ते मुलांपुढे ठेवायचे.आम्हाला तेवढी सर्व्हिस म्हणजेपण एकदम रॉयल वाटायची.त्याकाळी सुट्टीच्या काळात मुलांना घेऊन तुळशीबागेत खरेदी आटपल्यावर बायकांचा आवडता कार्यक्रम म्हणजे श्रीकृष्णची ब्राम्हणी पद्धतीची मिसळ किंवा अगत्यमध्ये डोसा खाणे,नंतर शनिपाराच्या चौकात मुरलीधर रसवंती गृहात उसाचा रस प्यायला मुलांना घेऊन जाणे.चैनीची परमावधी म्हणजे ‘कावरे कोल्ड्रिंक’मध्ये कसाटा आईस्क्रीम खाणे.हे एकदा खाल्ले तर त्यावेळी मुलांना निदान सहा महिनेतरी ऐकायला पुरायचे.
आज गिर्हाईकानी ओसंडून वाहणारे शनीच्या पाराजवळचं ‘श्री उपहार गृह’ तेव्हा नुकतच सुरु झालेले होतं.आणि फडके हौद चौकाच्या अलीकडचे वैद्य तेव्हाही (आणि आताही ) बिना तिखट घालता फक्त वाटलेलं आले घालूनच मिसळ करायचे,पण त्या तिखटाचा गोडवा काय वर्णावा ?आज नुकतेच मिसरूड फुटून ब्रॉयलर अंड्यातून बाहेर पडलेले,नवीन खवैये जेव्हा आपल्यालाच वैद्य मिसळीची महती सांगताना रेल्वे ऑफिसच्या शेजारी अशी खुण सांगतात.तेव्हा “माहित्ये मला”असं हसत सांगावं लागतं.
(आतून प्रचंड पुणेरी चिडचिड झालेली असते,आता पुणेरी चिडचिड काय? ह्याचाबद्दल पुन्हा कधीतरी.)
बाजीराव रस्त्याला दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पलीकडच्या बाजूला ‘मार्केट टी’नावाचं एक उपाहारगृह अजूनही आहे.तिथे भरपूर तर्री मारलेला ‘सँपल’पाव झकास मिळायचा.त्यावर कडक चहा पिवून लोकं तृप्त व्हायची.तशीच कीर्ती अजूनही टिकून आहे ती टिंबर मार्केट मधल्या ‘महेश भुवन’ची.तेवढीच छान मिसळ अजूनही.
गावात म्हणजे पुण्यात राहणारे तिखट मिसळ खाणारे हटकून टिळक रस्त्यावरच्या खन्ना ह्यांच्या ‘रामनाथ ‘मध्ये आवर्जून हजेरी लावायचे.त्यावेळचे रामनाथ म्हणजे पत्र्याची शेड घातलेलं दुकान .त्यावेळच्या पद्धतीनी आत गेल्यागेल्या उजवीकडे छोटेखानी चणीचे हसतमुख मालक खन्ना कधीतरी स्वतःवडे,भजी तळताना दिसायचे.डावीकडे असलेया लाकडी बाकांवर घामाघूम होवून बसलेल्या गिऱ्हाईकांना सरसकट एकच रस्सा वाढला जायचा.फक्त तिखट.पण त्या तिखटाला पण एक झकास चव असायची.त्याच्याबरोबर तोंडी लावायला अगदी सातारा ,कोल्हापूरकडे मिळतो तस्सा मोठ्ठा वडा.पण इकडे गर्दी असायची ती फक्त एकट्या,किंवा मित्रांसोबत येणाऱ्या पुरुषांची,म्हणजे तसे हॉटेल कधी ‘फ्यामेली रेस्तरॉ’ झालेच नाही.टिळक रस्त्यावर दर्दी लोकांसाठी मिसळसाठी तसंच जुने आणि प्रसिद्ध म्हणजे ‘संजीवनी’.त्यांच्या मिसळची चव घ्यायला येणाऱ्या ग्राहकात ‘अभिनव’कॉलेजच्या मुलांची गर्दी जास्ती. 
तसे ठिकाण तिकडे लक्ष्मी रस्त्यावर खरेदी आटपून घरातले सगळेजण खास मराठी पदार्थ खायला म्हणून जायचे ते म्हणजे गणपती चौकाच्या जवळचे सरपोतदारांचे ‘पूना गेस्ट हाऊस’मध्ये.सुग्रास मराठी थाळी पासून ते साबुदाणा खिचडी,अळूवडी,कोथिंबीर वडी पर्यंत सगळे पदार्थ एकाच ठिकाणी म्हणजे त्याकाळी अप्रूपच होतं.
टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळासमोर असलेलं ‘तिलक’पण ९० च्या आसपास सुरु झालेलं होतं.‘तिलकचे’ सामोसे, ब्रेड पॅटीस,आणि चहा आजही तिच चव राखून आहेत.त्यात नंतर पाणीपुरी वैगेरे प्रकारांची भर पडत गेली.
क्रमश:
©अंबर कर्वे,पुणे
पूर्वप्रसिद्धी :- दैनिक पुण्यनगरी-तेजोमय दिवाळी- २०१५
आठवणी शिदोरीच्या
एव्हाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगमाच्या बद्दल बर्याच जणांचे काही अभिप्राय ऐकले,वाचले असतील.माझा अनुभव त्यातील ‘सपोर्टिंग अॅक्टीव्हीटी’ शिदोरी ह्या उपक्रमाच्याबद्दल. पुण्यात कार्यक्रमासाठी साधारण ८०,००० अतिथी स्वयंसेवक येणार.त्यांना साधारण १ तास ते ८ तास प्रवास करून घरी परत जाताना;बाहेर काही खायला लागू नये म्हणून जाताना त्यांच्याकडे प्रत्येकी १० पुऱ्या,त्याच्याबरोबर पुरेशी शेंगदाण्याची चटणी आणि तिळगूळाच्या दोन वड्या ह्याची शिदोरी,पुणे शहरातून गोळा करून त्यांच्यापर्यंत पोचती करायची होती.अशी संकल्पना जी फक्त रा.स्व.संघाच्याच विचारात असू असते.अजून कुठे असल्याची निदान माझ्यातरी बघण्यात नाही.संघ आपल्या स्वयंसेवकांचा किती विचार करतो ह्याची ही फक्त एक झलक आहे.बर्याच बिगर राजकीय संघटनांच्यासारखी ढाबा,मोटेल संस्कृती संघात नाही,ह्याचेच हे प्रतिक आहे.
माझ्याकडे शिदोरी जमा करायची जवाबदारी घेतल्यावर,काही मेसेज पाठवले आणि परिचितांनी ते तेवढ्याच प्रेमानी पुढे पाठवायला सुरुवात केली.आणि मग सुरु झाला फोनचा सिलसिला.पहिल्यांदा पुण्यातल्या मित्रांना मेसेज मिळाल्यावर त्यांचे लगेचच फोन यायला सुरुवात झाली.
काय रे,आम्हाला तुझ्याकडे असे काम सुरु आहे हे बाहेरून समजणारे का?
हीच का तुझी दोस्ती ?आम्हाला सांगितल असत तर आम्ही काय अडवणार होतो का?
नालायका,शिदोरीच्या नावाखाली सगळ्या पुऱ्या स्वतःच संपवायचा विचार नाहीये ना ?ह्या ह्या ह्या
अजून काय दिवे लावतोयस कार्यक्रमात?ते पण आत्ताच सांगून ठेव.नंतर समजलं तर ग्रुपमधून कायमस्वरूपी हकालपट्टी.वगेरे वगेरे.मित्रांच्या ह्या बोलण्यानी काम करायला मजा येतेच.पण त्याहीपेक्षा मजा सुरु झाली अनोळखी लोकांचे फोन यायला लागल्यावर.साधारण दुसर्याच दिवशी एका वयस्कर बाईंनी फोन केला.नमुनादाखल संभाषण वाचा.
त्या- “कोण अंबर कर्वे ना ?”
मी-‘हो’
त्या-“मी अमुकअमुक बोलत्ये.मला तुझा नंबर माझ्या भाच्यानी पार्ल्यावरून पाठवला,नाव अमुकतमुक.(आपण सध्या सोयीसाठी त्याचे तात्पुरते नामकरण सचिन करूया )
सचिन माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा.तुझा मित्र आहे ना तो ?”
मी-“नाही हो.पण त्यात काय?बोला ना मावशी” (त्यांनी जर परस्पर मला भाच्याचा मित्र ठरवलं तर मी त्यांना मावशी म्हणणे ओघानेच आलं.)
तर
मावशी -“अरे तू ते शिदोरीचं काम बघतोयस ना?
मी-‘हो मावशी’
मावशी -“किती जमा झाल्या रे? जमतायत ना रे व्यवस्थित?"(शब्दात मनापासून काळजी)
मी- “हो मावशी,म्हणजे मी नुकतीच सुरुवात केल्ये,पण नक्कीच जमतील”.
मावशी -“किती कमी पडतायत?”
मी- [काहीच न बोलता फक्त ऑ! ]
मावशी -" हॅलो ,रेंज जात्ये का?काय झालं रे?”
मी-“अहो मावशी ८०,००० जणांसाठी गोळा करण्याचे काम सुरु आहे.त्यात माझ्याकडून कितीचा हातभार लागतो बघायचं”.
मावशी -“काही काळजी नको करूस.आम्ही आहोत ना!आता सांग केटरिंगवाला ठरवलाय का नाही अजून?”
मी(परत ऑ पण थोडा सावरून)“मावशी मेसेज तुम्ही वाचला नाहीयेत का?आपण बाहेरून केटरिंगवाल्यांकडून नाही करून घेणार.आपल्याला पुण्यातल्या घराघरातून शिदोरी गोळा करून द्यायच्या आहेत.त्याचे स्वरूप पुन्हा एकदा सांगू का?"
मावशी-“सांग बरं.मला मेसेज आला,आता नाही वाचत,मेला माझा चष्मा सापडत नाहीये कालपासून.”
मी माझी कॅसेट ऐकवली त्यांना.
मावशी-“अरे बापरे!भलतच मोठं काम दिसतंय.आता कसं होणार?सगळं एकट्याने जमणारे का?
मी-“अहो मावशी,मी ह्यातला अगदी छोटासा घटक आहे.खरंच खारीच्या वाटा उचलायचा आहे.इव्हेंट मी नाही करते.सगळे करणारा रा.स्व.संघ आहे.मी राहतो त्या रामबाग कॉलनी मधून जेवढ्या जमतील तेवढ्या शिदोरी गोळा करून द्यायची जवाबदारी मी घेतल्ये एवढंच.माझ्यासारखे शेकडो लोक पुणे शहरात आपापल्या भागात हे काम करतायत.काम मोठं आणि छान होणारे नक्की.”
मावशी-“हाहाहा मग बरं आहे.मला वाटलं..”
मी-आपण किती शिदोरीसाठी हातभार लावू शकता,सांगता?
मावशी-“हा तर ऐक.मी राहते कोथरूडमधे,म्हणजे जवळच रे तुझ्या घराच्या."
मी-‘हो’
मावशी-मी ३०-४० जणांचा उपमा नक्कीच बनवून देते.कसा आणि कुठे देवू ते सांग.
मी-परत ऑ..पण परत सावरून अहो मावशी आपल्याला तिखटमिठाच्या पुर्या द्यायच्या आहेत ना?त्याच्याबरोबर पुरेल एवढी शेंगदाण्याची चटणी.आणि दोन तिळगुळच्या वड्या.बास.बाकी काहीच नाही द्यायचं आपल्याला !
मावशी(न ऐकल्यासारखं करून)-ते ठीके रे.पण काही जणांना तेवढाच बदल होईल.सगळ्यांच्या डब्यात तेचतेच असेल तर गंमत येणारे का?तूच सांग.त्यापेक्षा सगळ्यांना थोडी व्हरायटी होईल.वाटून घेतील मुलं.
मी(काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळून नकळतपणे) -‘हं...अहो पण..
मावशी-“मला सांग कधी द्यायचय सगळं?"
मी-" दोन तारखेला.पण अहो मावशी आपल्याला पुऱ्याच द्यायच्या आहेत ओ."
मावशी(तरीही विक्रमादित्याच्या वरताण हट्टाने ,nonstop )हे बघ,अरे माझ्या हातचा उपमा म्हणजे आमच्याकडे मेजवानी असते.माझ्या मुलांचे म्हणजे मुलं आता अमेरिकेत असतात,पण त्यांचे सगळे मित्र पण अजूनही आठवण काढतात माझ्या हातच्या उपम्याची. पाहिजेतर तू आधी एकदा खायला ये उपमा माझ्या हातचा.नाही आवडला तर मग नाही देत मी.
मी ( ऑलमोस्ट रडकुंडीला येवून )-“मावशी,त्याच्याबाबतीत मला काहीच नाही म्हणायचंय ओ.खूपच छान होत असणार.पण आपल्याला आत्ता फक्त सांगितलेला मेन्यू तयार करून द्यायचा आहे.तो पण प्रत्येक घरातून शक्यतो १ शिदोरी.
मावशी (आता थोड्या रागात) हे बघ.माझे वडील पण संघात होते.मीपण लहानपणी समिती मध्ये जायचे.आमचे ‘हे’ पण पूर्वी संघाचे काम करायचे.मला माहिती आहे संघ कसा असतो ते.आता ऑपेरेशन नंतर हे घरीच असतात.नाहीतर असा शिवशक्ती संगम होतोय म्हणल्यावर न चुकता गेले असते.त्यामुळे आमचा काहीतरी हातभार लागलाच पाहिजे.मी शिदोरी देणार म्हणजे देणार.”
मी-“मावशी,अहो नक्कीच द्या.मी स्वतः तुमच्या घरी येवून घेऊन जाईन,फक्त १० च्या पटीत जमतील तेवढ्या पुऱ्या,चटणी,आणि प्रत्येक शिदोरीच्या बरोबर वड्या घालून द्या.बास.आता सांगा किती शिदोर्या द्यायला जमतील?मी तुमच्याकडे तेवढे पॅकिंगचे मटेरियल पोचवतो.
मावशी-“अरे तेच तर सांगत्ये ना!! मला आता पुऱ्या उभं राहून तळायला अवघड जातं.सध्या माझी नेहमीची बाईपण रजेवर आहे,तिच्या मुलीचे लग्न आहे नेमकं.त्याचवेळी आलंय अगदी.ती असतीतर काळजीच नव्हती मला.
मी-(हे सगळं त्यांनी कधी सांगितलं मला? ह्या संभ्रमात)हो मग सांगा काय करता येईल?
मावशी-“पुऱ्या तळून देणारी बाई आहे का रे कोणी माहितीत? "
मी-“माझ्या? "(परत ऑ वासलेला)
मावशी-"नाहीतर काय? संघाची माणसं तुम्ही.तुमच्या ओळखीत तर हल्ली पंतप्रधानही असतात.हाहाहा. येवढं माणूस शोधायला काही जड नाही तुम्हाला.म्हणजे बाईचे पैसे मीच देणार,फक्त तुमच्या माहितीत कोणी असेल तर सांग.एकच दिवस काम.मी कणिक मळून आणि पुऱ्या लाटूनपण देईन.तिने फक्त तळून द्यायच्या.चांगली वाटली तर माझ्याकडे अधूनमधून स्वयपाकाला पण बोलवत जाईन तिलाच.शक्यतो गरजूच बघ हा.म्हणजे तेवढीच एखाद्या गरिबाला तरी मदत जाताजाता.ऐकतोयस ना?”
मावशी अक्षरशःधोधो बरसत होत्या.मी त्यांचा उत्साह ‘ऐकून’ थक्क होवून फक्त ऐकत बसलो होतो.
मावशींना कोणी असेल तर कळवतो असं सांगितलं.नंतर फोन ठेवून विचार करायला लागलो. केवढी ती लोकांची इच्छाशक्ती ?ज्यांची मुलं परदेशात,नवरा अंथरुणावर,कोणाचीही काम करायची सक्ती नसताना कोण सांगते ह्यांना ही कामे करायला ?
हा फोन तर फक्त प्रातिनिधिक होता.असे कितीतरी लोक फोनवर बोलले,येवून प्रत्यक्ष भेटले.अश्याच एक बाई,कदाचित त्यांना आवडणार नाही म्हणून,त्यांचे नाव सांगत नाही.दोनतीन वेळा फोन केला,पण भेटायला येवून शिदोरीचे पॅकिंगचे मटेरियल घेऊन जाणे बहुदा काही जमत नव्हतं त्यांना.मी आणून देवू का विचारलं तर नको म्हणाल्या.एकदा मी घरातून बाहेर पडणार नेमका त्याचवेळी पुन्हा एकदा त्यांचा फोन आला.मी आधीच्या अनुभवावरून थोडा त्रासलेल्या आवाजात आज तरी नक्की येणार ना?अशी खात्री करून घेतली आणि घरी थांबलो.त्यादिवशी मात्र त्या ठरल्याप्रमाणे आल्या.बघितलं तर त्या पोलियो रुग्ण.दोन्ही पायात कॅलिपर्स घालून बाहेर रिक्षा वेटिंगला थांबवून माझ्या घरी आत आल्या होत्या.मला त्या माउलीच्या हातात पॅकिंगचे मटेरियल देताना भरून आलं.त्यांनी मात्र हसतमुखाने ते कंटेनर घेवून सांगितलेल्या वेळात,त्यात सगळी शिदोरी भरून ते परत आणून देखील दिले.तेवढेच सहजतेने.केवढेतरी वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे अनुभव.
कशी ही माणसे फक्त संघाच्या कार्यक्रमाचे नुसते नाव ऐकलं तरी स्वतःचे सगळे आजार विसरतात आणि एखाद्या तरुणाच्या उत्साहाने काम करतात?कोण आहे ह्याच्या मागे?ही तळमळ बघायची असेल तर आपल्याला संघातच जायची गरज आहे,असं बिलकुल नाही.फक्त पूर्वग्रहदुषित नजर नसेल त्या प्रत्येकाला ही भावना सर्वसामान्य जनतेमध्ये दिसून येईल.संघ ज्या निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करतो.प्रत्येक आपत्तीमध्ये संघ स्वयंसेवक ‘कार्यामध्ये’ सगळ्यात पुढे दिसतात.त्यांच्यासाठी काहीतरी करायची,त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवायला समाजातला प्रत्येक घटक उत्सुक असतो.फक्त नजर स्वच्छ पाहिजे,संघाच्या कामासारखी.
तर संघाच्या इतिहासातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा कार्यक्रम जसा ठरवला तसाच्या तसा पार पडला.एका जागेवर साधारण लाखभर लोक दिलेल्या जागेत शांतपणे राहतात.तिथे जेवण करतात,तिथे त्यांचे संचलन होतं.दुसर्या दिवशी जवळपास दोन लाख स्वयंसेवकांच्या समोर , त्या संघटना प्रमुखांचं भाषण होतं,त्यावेळी अक्षरशः टाचणी पडेल तर त्याचा आवाज होईल एवढी शांतता असते.
' देश पहिला , देशकार्य सगळ्यात मोठे ' हे पुन्हा एकदा मनावर ठसवले जाते .कार्यक्रम संपतो .
कार्यक्रम बघायलाही जवळपास पाउण लाख लोक आलेले असतात .त्यांच्या जाण्यायेण्याची सोय तेवढीच व्यवस्थित केली जाते,ती पण त्यांच्याकडून माफक पैसे घेऊन (आणि इतर राजकीय सभा आयोजित करणाऱ्या लोकांसाठी विशेष म्हणजे, कोणाला येण्यासाठी पैसे द्यायला नाही लागत)
होऊ शकतं हे असं काही भारतीय सैन्यदल सोडून इतर कुठल्याही राजकीय / बिगर राजकीय संघटनेत ?
हे वाचणार्या आणि वेगळी राजकीय विचारधारा असलेल्या माझ्या मित्रांनी ह्याचे उत्तर आपल्या मनालाच द्यावे हे चांगलं . कारण उत्तर सगळ्यांनाच माहित्ये , फक्त मान्य करणे सगळ्यांना जमेल असं नाही .
ह्या आयोजनासाठी १०,००० संघस्वयंसेवक सहा महिन्यांपासून अविरत कष्ट घेत होते.सगळ्यांची भावना एकंच,संघासाठी काम करणे ,बास त्यांच्यासाठी विषय संपला.
मलातर केवढीतरी चांगली माणसे ह्या निमित्तानी नव्याने भेटली.शिदोरी बनवून देणाऱ्या बर्याच जणांनी पॅकिंग करून आमच्या घरी व्यवस्थित आणून दिले.त्या सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानणे मुश्कील आहे. संघाचे स्वयंसेवक तर माझ्याच नाही तर प्रत्येक फोनला ज्या तत्परतेने उत्तर देत होते ,त्यातून प्रत्येक कॉलसेंटरवाल्यांनी शिकावे. माझ्यासारख्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यासाठी तर हा सगळा प्रोजेक्टच, मॅनेजमेंटचे शिक्षण देणारा आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.त्याविषयी पुन्हा कधीतरी.
पण ज्या आपुलीकीने ह्या सगळ्यांनी हे काम मार्गी लावले,त्याला तोड नाही.ह्या ‘शिवशक्ती संगमाच्या’ सगळ्या मानकर्यांना माझा त्रिवार मुजरा !
अंबर कर्वे , पुणे
९.१.२०१६
Photos Courtesy  from Internet